जर आय बॉल (संपूर्ण डोळा) जो गोलाकार आकारात असतो, त्याच्या आकारात एका मिलीमीटरने फरक पडला, तरी देखील डोळ्यांच्या पडद्यावर प्रकाशाची किरणे योग्य पद्धतीने पोहचत नाही. त्यामुळे अस्पष्ट दिसू लागते. आय-बॉल लांबला असेल (इलॉन्गेट) तर त्यास मायोफिया म्हणतात; त्यामुळे दुरचा चष्मा लागतो. आय-बॉल छोटा अथवा दबला असेल तर हायपरमेट्रोपिया असे म्हणतात; त्यामुळे जवळचे दिसण्यास अडचण येते.
या शस्त्रक्रियेत लेजरद्वारे कॉर्नियाचा आकार बदलवितात. जेणेकरून प्रकाश किरणे योग्य प्रकारे फोकस होऊन, रेटिनावर परिपूर्ण अशी प्रतिमा निर्माण होते आणि स्पष्ट दिसू लागेल. सोप्या भाषेत सांगायचे तर आपण लेजरद्वारे कॉर्नियाच्या आकाराला ‘रिमॉडेल’ करतो. या शस्त्रक्रियेत कॉर्नियाला छोटासा चिरा देऊन झडप(फ्लॅप) तयार करतात. त्या झडपेच्या खाली असलेल्या कॉर्नियाच्या भागाला लेजरद्वारे जाळून पूर्वीपेक्षा सपाट करतात. त्यामुळे फोकस करण्याची क्षमता वाढते व दुरवरचे दिसू लागते.
ही शस्त्रक्रिया वयाच्या अठराव्या वयानंतर किंवा नंबर स्थिर झाल्यावर करावी. त्यासाठी डोळे निरोगी असले पाहिजे. कॉर्नियाच्या वरचा पापुद्रा कापावा लागत असल्याने त्याची जाडी सामान्य असावी. कॉर्निया पातळ असेल तर शस्त्रक्रिया करू नये. आर्थरायटिस, एलएसई सारखे आजार नको. गर्भारपणात शस्त्रक्रिया करू नये.
या शस्त्रक्रियेपूर्वी दोन आठवडे कॉन्टॅक्ट लेन्स घालणे बंद करावे. नेत्ररोगतज्ज्ञ तुमच्या कॉर्नियाची जाडी बघतो, रेटिनाची संपूर्ण तपासणी यांचा समावेश असतो. मग व्यक्तीच्या डोळ्यांच्या नंबरनुसार शस्त्रक्रियेचे नियोजन केल्या जाते.
शस्त्रक्रियेपूर्वी डोळ्यात अॅनेस्थेटिक आय ड्रॉप घातल्या जातात. रुग्णाचे डोळे लेजर बीमच्या टप्प्यात घेतल्या जातात. रुग्णाची एकूणच माहिती त्या मशीनमध्ये ‘फीड’ केल्या जाते. काही मिनिटात लेसिक लेजर सर्जरी पार पडते. मग डॉक्टर डोळे तपासून लगेच सुटी देतात. पुढील काही दिवस नियमित तपासणीसाठी बोलवितात. ‘मायनस 2 ते मायनस 8’ पर्यंतचे नंबर सर्जरीद्वारे दुर करता येणे शक्य आहे. शस्त्रक्रियेद्वारे नंबर पूर्णपणे घालविता येत नाही मात्र, चष्म्यावरची निर्भरता मात्र नक्कीच कमी करता येते. चाळीसीनंतर लागणारा चष्म्याचा जवळचा नंबर यामुळे दूर होत नाही. कॉर्नियाचा पापुद्रा कापल्याने डोळे कोरडे होतात. शिवाय छोटी जखम सुद्धा असते. त्यामुळे काही दिवस आवर्जुन काळजी घ्यावी. अलिकडे ट्रान्स पीआरके (स्मार्ट सरफेस) मुळे कॉर्नियाचा पापुद्रा न कापता शस्त्रक्रिया होते म्हणून दुष्परिणाम कमी झाले आहेत.
आता ही सर्जरी करावी का, असा प्रश्न पडला, तर एक सांगू इच्छिते की, ही सर्जरी म्हणजे कुठल्याही रोगावर उपचार (ट्रिटमेंट) नव्हे. ही एक ‘कॉस्मेटिक प्रोसिजर’ किंवा चष्म्याची निर्भरता कमी करणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया करावी की नाही हे व्यक्तीच्या पसंतीवर आणि प्राधान्यावर अवलंबून असते. मात्र, व्यक्तीची शारीरिक पात्रता(राईट पेशंट सिलेक्शन), योग्य व तज्ज्ञ डॉक्टरांची निवड आणि अत्याधुनिक मशीनी च्या सहाय्याने केलेली शस्त्रक्रिया नक्कीच लाभदायक ठरू शकते.